पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून करुन पती चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला. लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकुने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणाचा तपास चंदननगर पोलिसांकडून करण्यात आले आहे. खूनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.