मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट राम आणि सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आता आलिया भट्टने या चित्रपटातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता रामायण चित्रपटात आलियाच्या जागी दुसरी अभिनेत्री काम करणार आहे.
व्यस्त वेळापत्रकामुळे आलियाने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच या रामायण चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होण्यास आणखी वेळ लागणार आहे. तसेच रामाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीरने देखील त्याच्या भूमिकेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. या चित्रपटात आता साऊथची अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असल्याचेही म्हंटले जात आहे. मध्यंतरी रामायण चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यशने रावणाची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण आता यश ही भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. रावणाच्या भूमिकेसाठी यशचे लूक टेस्टही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, निर्माते 2023 डिसेंबर पर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर होईल असा अंदाज आहे. ‘रामायण’चे निर्माते अल्लू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा असतील. तर नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.