त्याच्याच सदनिकेत शिजला ललितच्या पलायनाचा कट
मैत्रिणींसह अनेकदा भेटी; सीसीटीव्ही फुटेज सापडले
पुणे – ड्रग तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रोझरी स्कूलचा संचालक विनय आऱ्हाना असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ललित पाटील याला आऱ्हानाने लष्कर परिसरातील स्वत:ची सदनिका उपलब्ध करून दिली होती. पलायनाच्या दोन दिवस अगोदर ललित याच सदनिकेत मैत्रिणीसोबत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले आहे. तेथेच पलायनाचा कट रचला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, “प्रभात’ने दि. 8 ऑक्टोबरला ललित पाटील याच्या पलायन प्रकरणी आऱ्हाना याचे कनेक्शन असल्याचे वृत्त दिले होते.
पोलिसांनी विनय आऱ्हाना याला बुधवारी अटक केली. त्याला आज (गुरुवारी) न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आऱ्हाना याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. एका बॅंकेकडून घेण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात सक्तवसुली संचनालयाने (ईडी) आऱ्हाना याला काही महिन्यांपूर्वीच अटक केली होती. ललित पाटीलवर ससून रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन पकडले होते. या प्रकरणात ललित पाटील सामील असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केले. या तपासात आऱ्हाना याचा वाहनचालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली. त्यानंतर संशयाची सुई आऱ्हान याच्याकडे वळली होती. आऱ्हाना आणि ललित पाटील 15 दिवस एकाच खोलीत होते. यावेळी आऱ्हाना याला डबा देण्यासाठी चालक डोके येत होता.
दरम्यान, आऱ्हान याने लष्कर परिसरातील स्वत:ची सदनिका ललित पाटील याला खुली करून दिली होती. तो अनेकदा ससून रुग्णालयातून बेकायदा बाहेर पडून मैत्रिणीसोबत सदनिकेत वेळ घालवत होता. पलायनाच्या दोन दिवस अगोदर तो मैत्रिणीला आऱ्हाना याच्या सदनिकेत भेटला होता. तेथेच त्याने पलायनाचा कट रचला. त्यानंतर पलायन केल्यावर त्याने आऱ्हान याची सदनिका गाठली. तेथे आऱ्हाना याच्या व्यवस्थापकाकडून दहा हजार रुपये रोख घेतले. व्यवस्थापकाने स्वत:चे एटीएम कार्ड ललितला वापरण्यास दिले होते. तर, चालक दत्ता डोके याने एसयूव्हीमधून ललित याला रावेतपर्यंत सोडले होते.