पुणे – लोहियानगर नाल्याजवळील प्रभाग क्रमांक १९ मधील सर्व्हे क्रमांक ५३/५४ मधील सहा गल्ल्यांमध्ये ड्रेनेज वाहिन्या तुंबत असल्याने या भागातील १५ ते २० घरांमध्ये दररोज सांडपाणी शिरत आहे. दैनिक प्रभातने ही बाब उजेडात आणताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शुक्रवार सकाळपासूनच या भागातील चेंबरची सफाई सुरू केली आहे.
ज्या घरांमध्ये पाणी शिरत आहे, त्या परिसरातही स्वच्छता सुरू केली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या त्रासातून या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील चेंबरची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त अविनाश संकपाळ यांनी दिली. या भागातील नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून रहिवाशांना घरे दिली जाणार आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे योजनेचे कामच सुरू झालेले नाही. त्यामुळे परिसरात मलनि:स्सारणाची कामे करता येत नाहीत, असा दावा केला जात आहे.
महापालिकेच्याच ड्रेनेज स्वच्छता विभाग तसेच परिमंडळ उपायुक्त कार्यालयाकडून ड्रेनेज लाइन बदलणे अथवा त्याची दुरूस्तीची कामे केली जात नाहीत. त्यासाठी निधीची मागणी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी केली, तरी एसआरएचे कारण देत तुटपुंजा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने या नागरिकांचे जगणे कठीण झाल्याची बाब दैनिक प्रभातने पुणेकर येथे सांडपाण्यात राहतात या वृत्ताद्वारे उजेडात आणली होती.
मुख्य सांडपाणी वाहिनी बदलणार
नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी शिरत असल्याची बाब समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही गंभीर दखल घेत, मलनि:सारण विभागाला अंदाजपत्रकात तातडीने निधीसाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, २ कोटी रुपयांचा निधी या कामासाठी दिला जाणार आहे. हा निधी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात दिला जाणार असला, तरी या कामासाठीची निविदा प्रक्रिया आतापासूनच राबविली जाणार आहे.
चेंबरच्या सफाईचा खर्च गेला कोठे ?
महापालिकेकडून शहरात दरवर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणात चेंबरची साफसफाई केली जाते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. या क्षेत्रीय कार्यालयाकडूनही ही कामे झालेली आहेत. मात्र, त्यानंतही शुक्रवारी सफाई करताना या भागात मोठया प्रमाणात गाळ तसेच कचरा अडकल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या भागात सांडपाणी तुंबत आहे. त्यामुळे नक्की चेंबरची सफाई झाली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.