पुणे : गाडीच्या सस्पेशनचे काम वॉंरंटीमध्ये करुन देत नसल्याने एका ग्राहकाने चारचाकी गाडीच सर्व्हिस सेंटरमध्ये पेट्रोल ओतून पेटवून दिली. ही घटना वाघोलीतील क्रिस्टल होंडा शोरुममध्ये घडली. याप्रकरणी ग्राहकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज विनायक पाटील (४३,रा.चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार दिपक दौंडकर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.दिपक दौंडकर यांनी क्रिस्टल होंडा शोरुममधून होंडा सिटी कार घेतली आहे.
गाडीचे सस्पेंन्शन खराब झाले होते. ते वॉरंटीमध्ये बदलून द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. ते बदलून मिळत नसल्याने त्यांनी बाटलीत आणलेले पेट्रोल स्वत:च्या गाडीवरओतून लायटरच्या सहाय्याने गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
तेथील कर्मचाऱ्यांनी ही आग तातडीने विझवली. बेजबाबदारपणा, मानवी जीवीतास धोका आणि व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोघे करत आहेत.