पिरंगुट – हिंजवडी (ता. मुळशी) येथे झालेल्या कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरवर चितपटीने विजय मिळवला. विजेत्या माऊली कोकाटेला रोख तीन लाख रुपये व मानाची गदा भेट देण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बेमुदत निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 32 निकाली कुस्त्या पार पडल्या. कुस्ती मैदानाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, मावळ लोकसभा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदींच्या हस्ते संपन्न झाले.
मैदानातील दोन नंबरच्या कुस्ती पृथ्वीराज मोहोळने योगेश पवार वर मात केली. अन्य कुस्तीमध्ये मुन्ना झुंजुरके, अक्षय गरुड, अभिजीत भोईर आदींनी विजय मिळवला. यानिमित्त राष्ट्रीय स्वर्ण पदक विजेते महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान पांडुरंग खानेकर यांना मुळशीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच बबनराव साखरे, विष्णुपंत हुलावळे, दिलीप हुलावळे, विठ्ठल जांभुळकर, भगवान साखरे, एकनाथ साखरे, अमित मनोरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, कांताबाई पांढरे, दीपक करंजावणे, गणेश जांभुळकर, विशाल साखरे, तानाजी हुलावळे, दत्तात्रय साखरे, मारुती निकाळजे, अविनाश भोसले, कैलास ढोले, शरद जांभुळकर, सागर साखरे, केशव पहाडी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळशी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब साखरे, स्वप्नील साखरे, ओंकार साखरे, समाधान बोबडे, प्रदिप भिंताडे, माजी उपसरपंच गणपत जगताप आदींनी नियोजन केले होते.