वाघोली – पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून यात १८ लोकप्रतिनिधींचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. असा आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढला आहे. यात वाढ झाली असून अजून ९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके, लोहगावचे पांडुरंग खेसे यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तावित १८ लोकप्रतिनिधींची पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावातील विकास कामासाठी गठित समितीमध्ये सदस्यपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमध्ये १८ लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती करण्यास शासन मान्यता दिली आहे.
यात वाढ करण्यात आली असून अजून ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पांडुरंग एकनाथ खेसे, बाबुराव दत्तोबा चांदेरे, दत्तात्रय बबनराव धनकवडे, राकेश राजेंद्र कामठे, भगवान लक्ष्मण भाडळे, शांताराम रंगनाथ कटके, गणेश बाळासाहेब ढोरे राहुल सदाशिव पोकळे, अजित दत्तात्रय घुले यांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र ही समिती स्थापन कधी होणार असा सवाल आता नागरिकांकडून केला जात होता. या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चा झाली होती.