पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – युगप्रधान जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवार (दि. २९ मार्च) रोजी भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्या दरम्यान ‘ड्रग्ज फ्री पुणे’ आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ मोहीम याविषयी आचार्य श्री महाश्रमणजी पुणेकरांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अणुव्रत विश्व भारती सोसायटीच्या सदस्या पुष्पा कटारिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
शिवाजीनगर येथून या भव्य अभिवादन यात्रेला प्रारंभ होणार असून, पुढे शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती, शिवाजी रस्ता, स्वारगेटमार्गे बिबवेवाडी येथे जाणार आहे. तेथील गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात या अभिवादन यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये भव्य रथासह धवल सेनेचे हजारो पाईक आणि जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी ड्रग्जमुक्त भारत हे अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत होणाऱ्या पुणे भेटीदरम्यान ते याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
अणुव्रत विश्व भारती सोसायटीच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणार्थी, स्वयंसेवक आणि गटप्रमुखांचे संघटन करण्यात आले असून, शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. ड्रग्ज आणि डिजिटल माध्यमांनी आजच्या तरुण पिढीला विळखा घातला असून, त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी संपूर्ण भारतात हजारो मैलांची पदयात्रा करत आहेत. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुणेकरांनी महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन पुष्पा काटारिया यांनी केले आहे.