मंचर (प्रतिनिधी) – शिवसेना उपनेते, पुणे म्हाडाचे सभापती, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक, अध्यक्ष असणार्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी, चिंचोली या संस्थेला बँकिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा बँको पतसंस्था सहकार परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. डेल्टिन रिसॉर्ट, दमन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी दिली.
सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी ईन्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्ष पतसंस्था आणि सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. या कामाचा एक भाग म्हणून प्रामाणिक आणि अचूक काम बजावणार्या, सरकारी कायदे व नियमांची चौकट सांभाळून, प्रगती साधणार्या पतसंस्थांचा हुरूप वाढवण्यासाठी बँको पतसंस्था सहकार परिषद आणि बँको पतसंस्था ब्लू रिबन हा संयुक्त कार्यक्रम राबवत असते.
राज्यस्तरावर भरवल्या जाणार्या सहकार परिषदेत बँकिंग क्षेत्रातील विविध तज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती मार्गदर्शन करत असतात. बदलत्या काळाशी जुळून घेण्यासाठी सहकार क्षेत्राने कोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत? कायद्याच्या चौकटीत राहून प्रगती साध्य करण्यासाठी काय करावे लागेल ? जाचक कायद्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन काही उपाययोजना करता येते का? याबाबत या परिषदेत चर्चा केली जाते.
या चर्चेतून बँकिंग व्यवसायासाठी मोलाचे ज्ञान आणि सहकार्य केले जाते. यावर्षी बँको पतसंस्था ब्ल्यू रिबनची दशकपूर्ती साजरी केली जात आहे. या प्रसंगी या पुरस्काराचे वितरण केले गेले.
भैरवनाथ पतसंस्थेने केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
टंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा, सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रासाठी कटिबद्धता, नैसर्गिक आपत्ती मदत (दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त) करोना ग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत, पतसंस्थेमार्फत आदिवासी भागात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा वसा यापुढील काळातही राबवला जाणार आहे. -सागर काजळे, उपाध्यक्ष भैरवनाथ पतसंस्था