पुणे – लोकअदालतमध्ये सलग दहाव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात प्रलंबित स्वरूपाची 16 हजार 446 हजार आणि दाखलपूर्व स्वरूपाची 1 लाख 2 हजार 119 असे एकूण 1 लाख 21 हजार 177 प्रकरणे निकाली काढली.
राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशांनुसार आणि प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये हे लोकअदालत आयोजित करण्यात आली होती.
या लोकन्यायालयामध्ये एकूण 59 हजार 337 प्रलंबित आणि एकूण 1 लाख 55 हजार 757 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांतील 8 प्रकरणात सामंजस्याने तडजोड करुन त्यातील पती पत्नी दोन्ही पक्षकार आनंदाने नांदण्यास तयार झाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी दिली.
या लोकअदालतमध्ये बॅंक रिकव्हरी, तडजोडयोग्य फौजदारी आणि दिवाणी दावे, वीजबिल, कामगार वाद, भू-संपादन, मोटार अपघात न्यायप्राधिकरण नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, धनादेश बाऊन्स, महसुलचे दावे, ग्राहक वादाचे दाखल आणि दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.