पुणे -पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपी बस फेऱ्यांबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. कोणती बस कोठून सुटते? एखाद्या मार्गावर बसची वारंवारित किती मिनिटांनी आहे, हे प्रवाशांना समजण्यासाठी प्रत्येक थांब्यावर काही महिन्यांपूर्वीपर्यंत वेळापत्रक असायचे. मात्र, सध्या बहुतांश बसथांब्यांवरून वेळापत्रक गायब झाले आहे. त्यामुळे बसची वाट पाहताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पीएमपी प्रवाशांची संख्या वाढणे अपेक्षित असताना, ती त्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन बस सुरू ठेवणे आवश्यक असते. बसच्या मार्गांची पूर्ण माहिती सर्व थांब्यांवर प्रवाशांना समजेल, अशा पद्धतीने प्रदर्शित करणे अपेक्षित असते. शिवाय, एखाद्या मार्गावर बसच्या फेऱ्या किती वेळाने आहेत, याची माहिती थांब्यांवर असणे गरजेचे आहे. पण, सध्या शहरातील बहुतांश बसथांब्यांवर वेळापत्रकच आस्तित्वात नाहीत. काही महिन्यांपर्यंत असे वेळापत्रक दिसासचे. पण, आता पीएमपी कर्मचाऱ्यांनीच ते हटवले आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळ, मार्ग समजण्यात अडचणी येत आहेत.
नागरिकांची मागणी
वेळापत्रक नसल्याने एखाद्या मार्गावर प्रवासीसंख्या कमी होऊ शकते. त्यामुळे पुरेसे प्रवासी मिळत नसल्याच्या कारणाने मार्ग व त्यावरील बस बंद होऊ शकतात. त्यासाठी बस वेळापत्रक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पीएमपी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रवाशांचा असाही अनुभव…
शिवाजीनगर ते डीएसके मार्गावर दुपारी 3 वाजता बस सुटते. भारती विद्यापीठ भवनसमोरील थांब्यांवर ती 3.20 वाजता येते. मात्र, गेल्या काही दिवसांत अघोषितपणे ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत चौकशी केली असता, “ठेकेदारकडून बस उपलब्ध झाल्यास सोडली जाईल’ असे उत्तर प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, बस नियमित का धावत नाही? तिचे वेळापत्रक का नाही? याचे उत्तर मात्र मिळत नाही.
अधिकारी म्हणतात…
बसथांब्यांवर वेळापत्रक का नाही? याची माहिती घेतली असता, पीएमपीचे अधिकारी म्हणाले, “बसथांब्यांसाठी वेळात्रक दर्शवणारे स्टीकर तयार करणे सुरू आहे. पीएमपी बसचे टायमिंग, गूगल लोकेशनसाठी माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना बस वेळापत्रक आणि वारंवारिता ही माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, अद्ययावत वेळापत्रक थांब्यांवर लावले जाईल.’