– विविध बाबींसह सुधारित प्रस्ताव मान्य
पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयाच्या इमारत बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ८७ कोटी ४९ लाख रुपये खर्च येणार आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारत बांधकामाच्या ४२ कोटी ७० लाख रुपये इतक्या रकमेच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सारथी संस्थेने केलेल्या सर्व मागण्यांचा विचार करुन १२,२४५ चौ. मी. क्षेत्रफळाची मुख्य इमारत,
अंतर्गत फर्निचर, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण फायर फायटिंग, पाणी पुरवठा व जलनिस्सारण, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार, फ्युएल गॅस पाईप लाईन, बायोडायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर, अंतर्गत रस्ते, जमीन सुशोभिकरण, भुसर्वेक्षण, एअर कंडिशनिंग, अॅकॉस्टीकल ट्रिटमेंट, लिफ्टस, सीसीटीव्ही या बाबींसह सल्लागार शुल्क, लेबर इन्शुरन्स, आकस्मिक निधी, जीएसटी व भाववाढ या बाबींचा समावेश करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होता.
योजनेची अंमलबजावणी करताना प्रचलित शासन निर्णय, नियम, तत्त्वे, वित्तीय मर्यादा, निविदा कार्यपध्दती अनुसरणे, आवश्यकतेनुसार राज्य तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्पाच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निदेशांचे व त्रुटींची पूर्तता करणे याची सर्वस्वी जबाबदारी सारथी संस्थेची राहील. सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी, निविदाविषयक क्षेत्रीय निर्णय किंवा अनियमितता यास मान्यता गृहीत धरली जाणार नाही. अशा प्रकरणाची तपासणी त्यावेळच्या प्रचलित शासन नियमानुसार करण्याची जबाबदारी सारथी संस्थेची राहणार् आहे.
सुधारित प्रस्तावास नोव्हेंबरमध्ये मान्यता
बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव वित्त विभागामार्फत व्यय अग्रक्रम समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच काम पूर्ण करण्याची दक्षता विभागाने घ्यावी.