पुणे – डिसेंबर उजाडूनही पाठ फिरवलेली गुलाबी थंडी अखेर परतण्याची चिन्हे आहेत. पुढील दोन दिवसांत शहरातील कमाल व किमान तापमानात घट होईल. त्यामुळे दि. ६ ते ७ डिसेंबरनंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमात तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण आहे. गेल्या 24 तासांत कमी झालेल्या किमान तापमानात आज पुन्हा एक अंशाने वाढ झाली. त्यामुळे शहरात कमाल तापमान 32 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
विदर्भात पावसाची चिन्हे
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मिगजौम चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्येकडे सुरू आहे. त्यामुळे विदर्भ आणि आग्नेय मराठवाडा वगळता अन्य राज्यात हवामान कोरडे राहील. दि. ५ डिसेंबर चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यांत पाऊस पडेल. तर दि. 6 डिसेंबरला भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. दि. 7 नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.