अकोले – अकोले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धनाने उपजिल्हा रुग्णालय झाले असून, यासाठी ३७ कोटी ८५ लाख ११ हजारांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास शासनाने मान्यता दिली असल्याचा आदेश काल काढण्यात आला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन अकोले उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचे काम सुरु होईल, ही अकोलेकरांसाठी आनंदाची बाब आहे.
महराष्ट्र राज्य सरकारचे सहसचिव अशोक सत्रांत यांनी काल नुकताच एक जीआर काढून ३० खाटांचे अकोले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे इमारत बांधकामासाठी ३७ कोटी ८५.११लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास शासन निर्णयाने मान्यता दिली आहे. शासनाचे या निर्णयाने अकोले उपजिल्हा रुग्णालय होण्याचा मार्ग सुकर झाला. आता लवकरच या उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची ई-निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
या उपजिल्हा रुग्णालयामुळे अकोले तालुक्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. या उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची सुसज्ज सुविधा राहणार आहे. या रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॅाक्टर्स येथे उपलब्ध राहतील. वैद्यकीय अधिकारी (डॅाक्टरांची) तसेच अधिपरिचारका, परिचारक व कर्मचारी संख्याही जादा असेल. सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणीसह इतर अनेक सुविधा या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार असल्याने अकोलेकरांमध्ये या उपजिल्हा रुग्णालयाला निधीला मंजुरी मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
आजी-माजी आमदारांत श्रेयवादाची लढाई
अकोले ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम खर्चाचे अंदाजपत्रक आराखड्यास शासनाचे मान्यतेचा आदेश देताच अकोले तालुक्यात सोशल मीडियावर आजी व माजी आमदार यांच्यात श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाली आहे. भाजपाचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे आमदार यांनी आपणच पाठपुरावा कसा केला व निधी आपणस उपलब्ध करून आणल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.