पुणे – शहरात पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभाराची लख्तरे निघाली. कोट्यवधींचा खर्च करूनही शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून शहरातील 75 कि.मी. रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 329 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यातील 198 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. 132 कोटींच्या कामांना अंदाज समितीत मान्यता दिली मात्र, या दुरूस्त केल्या जाणाऱ्या रस्त्यांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील एकाही रस्त्याचा समावेश नसल्याचे महापालिकेच्या पथविभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या कामात यापूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील काही रस्ते घेण्यात असल्याने या भागातील नागरिकांना किंचीतसा दिलासा मिळणार आहे.
शहराच्या “प्रवेशद्वारांवर’च खराब रस्ते…
महापालिका प्रशासनाने दुरूस्तीसाठी घेतलेले रस्ते हे महापालिकेच्या 11 गावांच्या समावेशानंतरच्या जुन्या हद्दीतील आहेत. त्यात, 23 गावांचा समावेश नाही. मात्र, याच गावांमधून शहरात येणारे तसेच बाहेर जाणारे प्रमुख रस्ते आहेत. हे रस्ते राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात असल्याचे महापालिका सांगते. मात्र, गावे पालिकेत आल्याने ते पालिकेत आल्याने पालिकेनेच दुरूस्त करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.मात्र, महापालिकेने तूर्तास तरी हे रस्ते दुरूस्तीच्या यादीत घेतलेले नसल्याने या नवीन गावांना नव्या रस्त्यांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार आहे.
निधी नसल्याने अडचण…
महापालिका प्रशासनाने शहरातील 115 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 500 कोटींचा खर्च केला जाणार असला तरी, महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च पाहता पालिकेस एकाच वर्षांत एवढा खर्च करणे शक्य नाही, त्यामुळे महापालिकेने चालू वर्षासाठी 329 कोटींच्या खर्चास अंदाज समितीत मान्यता दिलेली आहे. तर उर्वरीत रस्ते पुढील आर्थिक वर्षात तरतूद करून केले जाणार आहेत. त्यामुळे चांगल्या रस्त्यांसाठी समाविष्ट गावांना आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे. समाविष्ट गावातील ज्या काही रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ते रस्ते क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 12 मीटरच्या आतील आहेत.
तब्बल 32 हजार ठिकाणी खड्डे…
महापालिका हद्दीत ( 23 नवीन गावे वगळून ) सुमारे 1400 कि.मी. रस्ते आहेत. या रस्त्यांवर यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल 32 हजार ठिकाणी खड्डे पडल्याचे तसेच रस्ते खराब झाल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे, महापालिकेने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून सुमारे 200 कि.मी.चे रस्ते नव्याने करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यात, यावर्षी सुमारे 350 कोटींचे रस्ते दुरूस्त केले जाणार आहेत. यात, शहरातील मुख्य रस्त्यांसह या रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचाही समावेश आहे. यामध्ये प्रमुख 50 रस्त्यांसह 12 मीटरच्या खालील रूंदीच्या 21 रस्त्यांचाही समावेश असणार आहे. हे खराब झालेले रस्ते पूर्णपणे उखडून काढून ते मुळापासून दुरूस्त केले जाणार असून त्यात 10 ते 15 क्रॉंक्रीट रस्त्यांचाही समावेश आहे.