पुणे – जपानी कलाकारांनी सादर केलेले अभिजात भारतीय संगीताचे सादरीकरण, जपान येथील पारंपारिक कलेचे प्रदर्शन आणि जपानी खाद्यपदार्थ आदींचा अनुभव घेण्याची पर्वणी पुणेकर कलाप्रेमींना मिळाली. कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई आणि इंडो जपान बिझिनेस काउंसिल (आयजेबीसी) यांच्या विद्यमाने ‘कोन्निचिवा पुणे २०२३ – एक्सपीरियन्स जपान इन इंडिया’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत आणि जपान दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान व्हावे आणि जपानी संस्कृतीची ओळख पुणेकर नागरिकांना व्हावी, या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जपानमधून खास भारतात आलेल्या कलाकरांसोबतच भारतीय कलाकारांचे सादरीकरण देखील महोत्सवात पाहायला मिळाले. महोत्सवाचे उद्घाटन कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यसुकता यांच्या हस्ते झाले.
यावेळी कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईच्या कॉन्सुलर मेगुमी सान, आयजेबीसीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, जपान फाउंडेशनचे महासंचालक कोजी सातो, फिडेलटेक सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी, आयजेबीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधुरी, संचालक ओंकार बारी, खजिनदार प्रशांत खिंवसरा आणि सदस्या शेफाली तिवारी आदी उपस्थित होते.
डॉ. फुकाहोरी यसुकता म्हणाले की, भारत आणि जपानच्या मैत्रीचे एक प्रतीक असलेल्या पुण्यातील कोन्निचिवा महोत्सवाला येण्याची माझी खूप दिवसांची इच्छा अखेर पूर्ण झाली. भारत आणि जपानच्या संस्कृतीमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही देशांच्या देवतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात समानता आहेत. बौद्ध धर्म उगम स्थान असलेल्या भारताचे आणि जपानचे नाते खूप जुने आहे, असे डॉ. यसुकता म्हणाले.
यानिमित्त नृत्यासह विविध कलाप्रकार सादर करण्यात आले.