पिंपरी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. 2023- 24 या शैक्षणिक वर्षात होणार्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनेक शाळांनी नोंदणी करून विद्यार्थी आवेदन पत्र भरलेले आहेत. शहरातील 119 शाळांनी 2 हजार 166 विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि परीक्षा शुल्क अद्याप भरले नाहीत. तर काही शाळांनी अद्याप नोंदणीही केलेली नाही. शुल्कासह आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये होणार्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 12 हजार 223 दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठीच्या शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे.
यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क तर इतर विद्यार्थ्यांना एकूण 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहत. एक सप्टेंबर 2023 पासून शाळा नोंदणी व विद्यार्थी यांचे अर्ज भरणे सुरु झाले आहे. शहरात 417 शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्याअंतर्गत 12 हजार 223 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. यात पाचवीसाठी 6 हजार 629, तर आठवीसाठी 5 हजार 594 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पण अद्याप 119 शाळांमधील 2 हजार 166 विद्यार्थ्यांचे शुल्क अद्याप भरले नाही. शाळांनी नियमित शुल्कासह शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर दिली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनेक शाळांनी अजूनही नोंदणी केली नाही, तसेच अनेक शाळांनी शुल्क भरले नसल्याचे आढळून आले आहे. संबंधित शाळांनी नोंदणी करून जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेस बसवणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधित शाळांना सूचना केल्या असून अनेक शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद आहे.
– सुभाष सूर्यवंशी, शिष्यवृत्ती समन्वयक, पिंपरी चिंचवड महापालिका.