नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे प्रचार सुरु झाल्यापासून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल या चांगल्याच चर्चेत आहेत. आपचे अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य सहायक बिभव कुमार यांच्यावर स्वाती मालिवाल यांनी मारहाण केल्याचे आरोप केले होते.
गेले काही दिवस यावरून स्वाती मालिवाल यांचा संघर्ष सुरु आहे. अशामध्ये आता त्यांनी नुकतेच एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत, असे सांगितले. तसेच, प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने एकतर्फी व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्यांना येणाऱ्या धमक्यात वाढ झाली आहे, असा गंभीर आरोप केला.
ट्विटमध्ये स्वाती मालिवाल म्हणाल्या की, “माझ्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील टिप्पणी करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा प्रकार सुरू केला आहे.
तसेच युट्यूबर ध्रुव राठीच्या एकतर्फी व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे. ध्रुव राठीसारखा एक मुक्त पत्रकार आपचा प्रवक्ता असल्यासारखा वागतो आहे.” अशी टीका यावेळी त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, “मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे.
त्यासाठी मला धमकावण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो आहे. तसेच ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझ्या फोन आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केले. ” असा यावेळी त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही स्क्रिनशॉटदेखील शेअर केले आहेत.