आळंदी – अंगावर नेसलीस नऊवारी साडी… कमरेवर चांदीचा कमरपट्टा… पायात चांदीचे पैंजण… गळ्यात सुवर्ण अलंकाराची माळ… कानात फुले, नाकात नथनी…कपाळी हळदी कुंकवाचा टिळा…केसात सुगंधी मोगर्याचा गजरा…हातात ओवशाने भरलेले ताट… असा सुंदर, विलोभनीय, आकर्षक असा पेहराव करीत राज्य परिसरातून सोमवारी (दि. 15) पहाटेच लाखोंच्या संख्येने महिला माऊलींना ओवसण्यासाठी अलंकापुरी नगरित येऊन दाखल झाल्या होत्या.
आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये मकरसंक्रांती निमित्ताने पहाटेपासूनच महिला भाविकांनी मोठी गर्दी दिसून येत होती. मकरसंक्राती निमित्ताने दरवर्षी माऊलींच्या मंदिरामध्ये ओवसा वाहण्यासाठी राज्यातील विविध ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या संख्येने महिलाआळंदीत येऊन दाखल झाले होत्या. प्रथा परंपरेप्रमाणे माऊली मंदिरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम देवस्थानच्या वतीने पार पडले तसेच दरवर्षी मकर संक्रात हा नवीन वर्षातील नवीन तसेच पहिलाच सण असतो त्यामुळे महिलांचा हा असणारा सण मकर संक्राती या दिनी माऊली मंदिरात पुरुष मंडळींना प्रवेश दिला जात नाही, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
आळंदीतील ग्राम दैवत भैरोबा, महालक्ष्मी, संतोषी माता, तुळजाभवानी, इतर सर्व देवतांची मंदिरे तसेच इंद्रायणी घाटावर सुद्धा महिला भाविकांची गर्दी दिसून येत होती. मकरसंक्रांती निमित्त हलव्याची, लहान मुलांच्या खेळण्याची तसेच इतर विविध दुकाने चावडी चौक येथील शाळेजवळील परिसरात लागलेली होती. सकाळपासूनच पीएमपीएम ल ऑटो रिक्षा व इतर खासगी वाहने मोठ्या संख्येने आळंदीमध्ये महिला भाविकांना चढ-उतार करीत होती, मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.