कोथरूड :- रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता समाजातील बंधुभाव वाढण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी भावना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनीही व्यक्तिगत महत्वकांक्षेच्यावर जाऊन परस्परांप्रती स्नेहभाव वृद्धिंगत करावा असा सल्लाही पाटील यांनी दिला.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे रक्षाबंधन निमित्त विद्यार्थिनींना त्यांच्या वाढदिवसाची तारीख असलेली नोट भेट देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वैविध्यपूर्ण नोटांचे संग्राहक सुरेश पोरवाल, अशोक पोरवाल,ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष सतीश गायकवाड, माजी नगरसेवक जयंत भावे, ऍड. मिताली सावळेकर, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, कुलदीप सावळेकर, अनुराधा एडके, ऍड. प्राची बगाटे,निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, गिरीश खत्री, शैलेश मेंगडे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळमकर, गोकुळ शेलार, मनोज नायर, पं. दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मुख्याध्यापिका एलीझाबेथ काकडे, मराठी माध्यमच्या मुख्याध्यापक अनिता मूळे उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच वेगळ्या संकल्पना राबवत असते. त्यातूनच विद्यार्थिनींना आयुष्यभर जपून ठेवता येईल अशी भेट देण्याचे ठरविले, त्यानुसार आज 250 विद्यार्थिनींना व शिक्षकांना त्यांच्या वाढदिवसाची तारीख असलेली नोट भेट देत असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.