प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -गणपती बाप्पांचे आगमन झाल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मनाच्या गणपतीसह अन्य मंडळांचे देखावे आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा चोरटे घेतात. त्यामुळे भाविकांनो सावधान…! आपण गर्दीमध्ये चाललाय, आपल्या गळ्यातील मौल्यवान वस्तू, मोबाइल आणि पैसे सांभाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरात सोनसाखळी आणि मोबाइल चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. त्यात सण-उत्सवामध्ये चोरटे ऍक्टीव्ह होतात. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे या गर्दीत चोरट्यांवर करडी नजर ठेवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरवर्षी गणपती उत्सवामध्ये देखावे पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता यांसह मानाच्या गणपती मंडळांसमोर भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांना चालता येत नाही एवढी गर्दी असते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जसा रस्ता मिळेल तसे पुढे-पुढे जात असतात. याच संधीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र, तसेच नागरिकांच्या खिशातील मोबाइल पैसे चोरून नेतात. गर्दीतून बाहेर पडल्यावर नागरिकांना आपल्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मोबाइल चोरल्याचे लक्षात येते. तोपर्यंत चोरटा पसार झालेला असतो.
सीसीटीव्ही, साध्या वेशातील पोलीस
गणेशोत्सवातील कायदा-सुव्यवस्था सुरक्षिततेसह चोरट्यांचा मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसांची करडी नजरही या गर्दीतील चोरट्यांवर असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र टीम तैनात केली आहे.
लहान मुलांचा हात सोडू नका
देखावे पाहण्यासाठी पुण्यातील नागरिकांसह विविध राज्य आणि परदेशातून नागरिक पुण्यात येत असतात. त्यामध्ये लहान मुलांची संख्याही अधिक असते. या गर्दीत लहान मुले हरविण्याच्या घटना घडतात. त्यावेळी पोलिसांकडून मुलाचे नाव पुकारून स्टेजजवळ येण्यास सांगतात. काही वेळात मुल आले नाही, तर तपास पथकाकडून तत्काळ सीसीटीव्ही तपासून शोध सुरू केला जातो. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना सांभाळावे. त्यांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संशयितांची तपासणी
देखावे आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वत:जवळील मौल्यवान वस्तू दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. वाढत्या गर्दीतील चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. गर्दीत संशयित व्यक्ती दिसल्यास त्याला बाजूला घेऊन तपासणी केली जात आहे. त्यामध्ये संशयित महिलांच्या पर्स तपासल्या जात असून, त्यासाठी मुख्य चौकांसह गणपती मंडळांजवळ पोलीस तैनात केले आहेत. “बीडीडीएस’कडून श्वानाच्या मदतीने सर्व वाहनांची तपासणी करून संशयितांना ताब्यात घेतले जात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दिली.
गेल्या 24 तासांत मोबाइल चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर अथर्वशिर्ष पठण झाले. त्यावेळी चोरीच्या घटना घडू नये, यासाठी मुख्य ठिकाणच्या बंदोबस्तासह परिसरातील गल्ली-बोळातही बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे एकही अनुचित प्रकार घडला नाही.
-प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1