पुणे – शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून नदीत सोडण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे वेळापत्रक पुन्हा कोलमडणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत महापालिकेकडून ११ सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील दहा प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.
मात्र, या प्रकल्पासाठी लागणार्या मशिन चीनमधील कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या मशिनच्या परीक्षणासाठी महापालिकेच्या अधिकार्यांना बोलविण्यात आले आहे. मात्र, चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक झाला असून काही शहरांमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे, महापालिकेचे अधिकारी चीनमध्ये जाण्यास तयार नसल्याने या मशिनचे परीक्षण रखडणार असून करोनाची साथ आटोक्यात आल्यानंतरच ही पाहणी केली जाणार आहे.
आधीच जवळपास सहा वर्षे उशिराने या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये ते पूर्ण कण्याचे महापालिकेचे नियोजन सुरू होते. तसेच या कामाबाबत केंद्र शासनानेही समाधान व्यक्त केले होते. मात्र, चीनमधील करोना प्रसाराचा फटका या प्रकल्पाला बसणार आहे. दरम्यान, या मशिन जानेवारी २०२४ अखेर भारतात येऊन त्या प्रत्यक्ष बसविण्याचे महापालिकेचे नियोजन होते.
जायकाकडून ८४१ कोटींचे अनुदान
शहरातील मुळा-मुठा नदीतील सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या माध्यमातून जपानच्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) ८४१ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हा प्रकल्प एकूण १४७३ कोटी रुपयांचा असून उर्वरित खर्च महापालिका करणार आहे. या प्रकल्पास २०१५ मध्ये मान्यता मिळालेली आहे. मात्र, प्रत्यक्षात दीड वर्षांपूर्वी काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात ३० टक्के बांधकाम तर ७० टक्के यंत्रसामग्री आहे. त्यातील बांधकाम वेगाने सुरू असून जानेवारी पासून यंत्रसामुग्री बसविण्यात येणार होती.
या यंत्रांमध्ये डी़- कॅन्टर नावाचे यंत्र असून सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रीयेतील हे सर्वात महत्वाचे मशिन आहे. या मशिनद्वारे शुध्द व अशुध्द पाणी वेगळे केले जाते. त्यामुळे हे मशिन बसविल्याशिवाय, इतर यंत्र सामुग्री जोडता येत नाही. या मशिन तयार असल्या तरी महापालिकेने त्याची एकदा प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी करणे आवश्यक असल्याने चीनमधील संबधित कंपनीने महापालिकेस डिसेंबरअखेर येण्याचे पत्र पाठविले होते. मात्र, करोना संकटामुळे महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे.