पुणे – महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांपासून दि. ११ डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जातो. या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अताा प्रत्येक महिन्यात एक दिवस लक्ष्मी रस्त्यावर “वाॅकिंग प्लाझा’ उपक्रम राबविला जाणार आहे.
याबाबत निर्णय घेण्यासाठी वाहतूक पोलीस, व्यापारी संघटना तसेच पथारी व्यावसायिकांची पुढील आठवडयात संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. ही माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. पादचार्यांबाबत जागृती तसेच नागरिकांनी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्किंग आहे. काही अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांंमुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशा स्थितीत कोंडीचा फटका ग्राहक तसेच व्यावसायिकांनाही बसतो. त्यामुळे या भागात आल्यानंतर नागरिकांना वाहन न वापरता तसेच चालत कोणत्याही अडथळ्याविना खरेदी करता यावी, या उद्देशाने महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पादचारी दिनाच्या धर्तीवर महिन्यातून एक दिवस वाॅकिंग प्लाझा केला जाणार आहे.
रविवारची निवड करावी
यावेळी सोमवारी झालेल्या पादचारी दिनी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला. मात्र, हा उपक्रम रविवारी राबवावा, अशी मागणी काही पुणेकरांनी महापालिकेकडे केली आहे. रविवार ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. त्याच दिवशी असा उपक्रम असल्यास कुटूंबासह त्यात सहभागी होता येते. इतर दिवशी शाळा तसेच कार्यालयीन कामांमुळे सर्वांना सहभागी होता येत नाही, अशी मागणी केली जात आहे.