पुणे- शहराला आणि शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणात एकूण 25.84 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 1.25 टीएमसीने हा पाणीसाठा कमी आहे. त्यातच शेतीसाठी सोडावी लागणारे दोन आर्वतने आणि शहराला वर्षभर पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी याची मागणी पाहता यंदा पाटबंधारे विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
यंदा समाधानकारक पावसामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे 100 टक्के भरली. यंदा जुलै ते सप्टेंबरदरम्यान खडकवासला धरणातून 6.39 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. मागील वर्षी प्रकल्पात 27.09 टीएमसी म्हणजे 93 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र प्रकल्पात 25.84 टीएमसी म्हणजे 88.62 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणे भरूनही शहराला मिळणाऱ्या पाणीसाठा नियंत्रित करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे. पुणे महापालिकेस दैनंदिन 846 एमएलडी पाणीवापरास परवानगी आहे. परंतु महापालिका दैनंदिन खडकवासला प्रकल्पातून 1,460 एमएलडी पाणी उचलत असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. शहराच्या पाण्यात कपात करून ते पाणी शेतीला द्यायचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.
धरणाचे नाव उपलब्ध पाणीसाठा टक्केवारी
खडकवासला 0.74 टीएमसी 37.67
पानशेत 10.45 टीएमसी 98.08
वरसगाव 11.38 टीएमसी 88.78
टेमघर 3.26 टीएमसी 88.05