पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना तसेच पक्षांना प्रचारासाठी वाहन परवाना, तात्पुरते पक्ष कार्यालय, हेलिपॅडचे बांधकाम आणि हेलिकॉप्टर उतरविणे आदींसाठी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी
१. लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षात
२. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय
३. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडण्यासाठी परवाना : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय
४. कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, ध्वनीक्षेपक परवाना : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे
५. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात फेरी, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्याचे आयोजन, ध्वनीक्षेपणाबाबत, स्टेज, बॅरिकेट आणि भाषणासाठी उंच व्यासपीठ (रोस्ट्रम) उभारण्यासाठी परवाना : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
६. हेलिपॅड बांधकाम, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवाना : ग्रामीण भागासाठी गृह शाखा-जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे शहर हद्दीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय