पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज उद्यानातून बिबट्या पळाल्याप्रकरणी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेस नोटीस बजावली आहे. या प्रकरणात तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतरही महापालिकेकडून ही माहिती प्राधिकरणास स्वत: कळविण्यात आलेलेली नसल्याचेही समोर आले आहे.
मागील आठवड्यात कात्रज प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात असलेला “सचिन’ नावाचा बिबट्या डोक्याने पिंजरा तोडून पळाला होता. तो तब्बल ४८ तास संग्रहालयाच्या आवारात होता. नंतर पिंजरा लावून त्याला पकडण्यात आले असले, तरी ही घटना घडल्यानंतर प्राणीसंग्रहालय प्रशासनाने तत्काळ केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणास कळविणे अपेक्षित होते.
मात्र, ही घटना त्यांच्यापासून लपवण्यात आली. त्यामुळे वृत्तपत्रांत ही माहिती आल्यानंतर प्राधिकरणाने याची गंभीर दखल महापालिकेस नोटीस बजावली असून या घटनेचा अहवाल मागवला असून माहिती देण्यास उशीर का करण्यात आला याचा खुलासाही मागितला आहे. त्यानुसार खुलासा पाठविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
अहवालानंतर संबंधितांवर कारवाई
बिबट्या पलायन प्रकरणाचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी उद्यान विभागासही दिल्या आहेत. सात दिवसांत हा अहवाल देण्याची मुदत देण्यात आली असून, या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या शिवाय विलगीकरणात असलेल्या प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या भागात सतत गस्त घालण्याच्या सूचनाही संग्रहालय व्यवस्थापनास करण्यात आल्या आहेत.