पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात फायर अलार्ममध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. त्यामुळे सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दल आणि प्रशासनाला दिली. तपासणीनंतर तंत्रज्ञांनी “फायर अलार्म’मधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले.
या गोदामात लोकसभा निवडणुकीत वापरण्यासाठी प्रथमस्तरीय तपासणी झालेले ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी सायं. सातच्या सुमारास येथील फायर सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी ही याची माहिती प्रशासनाला दिली आणि अग्निशमन सिलिंडर्स तिथे असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहनही मागविण्यात आले.
गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी निवडणूक आयोगाच्या परवानगीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला. तेथील सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सकाळी १०.३० वाजता यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोदामच्या आतील सर्व यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून बिघाड दुरुस्त करण्यात आला. राजकीय पक्ष प्रतिनिधींनादेखील याबाबत माहिती देण्यात आली.
संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले असून, याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. पुणे मनपा मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबीसंदर्भात अहवाल मागविण्यात आला असून, तो प्राप्त होताच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारीच्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली असून, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम सुस्थितीत आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी