कोथरूड -अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे हे महिलांसाठी अनोखी पर्वणी असून, देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडली आहे. त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी पुणेकरांनी प्रतिसाद द्यावा, असे मत भाजप राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
“आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्याना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे “हातमाग प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवास राव, हर्षल हॉलचे शाम कासट उपस्थित होते. प्रदर्शनात महाराष्ट्रासह 14 राज्यांतील 50 पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे.