पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रदेशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत १६ हजार ५८१ कोटींच्या एकूण ७२ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे २९ हजार १३ रोजगार निर्माण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्योग संचालनालय यांच्या अधिपत्याखालील जिल्हा उद्योग केंद्र पुणेतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर येथे जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद-२०२४ चे आयोजन करण्यात आले. डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.या कार्यक्रमात पॅनेल चर्चा, सामंजस्य करारावर स्वाक्षरी आणि राज्याच्या वाढीचा मार्ग आणि गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनाचा समावेश होता.
डॉ. दिवसे यांनी जिल्हा विकासासाठी विविध विभागांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी जिल्हा धोरण आराखड्याचे महत्त्व विशद केले. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्योग सहसंचालक रजपूत यांनी महाराष्ट्राच्या निर्यातीची परिस्थिती, उद्योगांना नियंत्रित करणारी धोरणे आणि आगामी गुंतवणूक परिषदेविषयी माहिती दिली. त्यांनी राज्याच्या निर्यात, उद्योग आणि आयटी-आयटीईएस धोरणांची रूपरेषा सांगितली.
गिरबाने यांनी प्रास्ताविकात विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली. निर्यातीत अग्रेसर पाच राज्यांपैकी एक महाराष्ट्र असल्याचे सांगताना निर्यातीला चालना देण्यात पुण्याच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.