बारामती, (प्रतिनिधी) – बारामती येथे आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या अनुषंगाने प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन मेळावा यशस्वी करा; मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत काळजी घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी सर्व संबंधित समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, नमो महारोजगार मेळाव्याकरीता नोंदणी झालेला प्रत्येक उमेदवार मेळाव्यात सहभागी झाला पाहिजे, यादृष्टीने नियोजन करावे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवाराचे दिवसनिहाय नियोजन करावे. बस व मार्गाची माहिती उमेदवारांना द्यावी. त्यासाठी पथकप्रमुख नेमावेत. त्यांना अल्पोहार, भोजन, पाणी, शौचालय, अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ आदी व्यवस्था करावी.
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कार्यक्रमस्थळी विषयानुसार स्टॉलची उभारणी करुन त्याची अधिकाधिक जनजागृती करा. प्रत्येक ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असून त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशा सूचनाही डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
डॉ. दिवसे म्हणाले, नोंदणी झालेल्या उमेदवारांची संख्या व आस्थापनांची संख्या लक्षात घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हानिहाय वाहनतळाची सुविधा करावी. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही दिवशी गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घ्या. त्यासाठी उत्कृष्ट उद्घोषकाची निवड करा. उमेदवारांना स्टॉलवर नेण्यासाठी संबंधित पथकप्रमुख, स्वयंसेवक यांची नेमणूक करावी. अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्तांनी सर्व कार्यक्रमस्थळांची पाहणी केली आणि विविध सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनबाबत माहिती दिली.
वैद्यकीय पथके नेमावीत
डॉ. देशमुख म्हणाले, कार्यक्रमाची व्यापकता लक्षात घेऊन सुरुवातीपासून समारोपापर्यंत प्रत्येक बाबीचे बारकाईने नियोजन करावे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनातील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करावी. त्यादृष्टीने वैद्यकीय पथके नेमावीत.