पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उच्चशिक्षित आयटी इंजिनियर पत्नीची ४० लाखांची फसवणूक व तिचा गर्भपात करून परदेशात पळालेल्या पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
हनुमंत अप्पाराव पाटील (मूळ चिखली, चिंचवड, सध्या लंडन ) असे त्याचे नाव आहे. एका उच्चशिक्षित आयटी इंजिनियर तरुणीशी लग्न झाल्यानंतर नवीन घर घेण्यासाठी पतीने तिच्याकडून तिच्या कमाईचे १२ लाख रुपये स्वतः च्या बँक खात्यावरती परस्पर वर्ग करून घेतले. तसेच २५ लाखांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स परस्पर स्वतःच्या नावावरती हस्तांतर केले.
तिच्या बँक खात्याचा पासवर्ड चोरून स्वतःच्या नावावरती पैसे वळवून सुमारे ४० लाखांची फसवणूक करून व तिचा गर्भपात करून पती परदेशात फरार झाला. त्यानंतर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती, त्याचे आई वडील व भाऊ यांच्याविरोधात फसवणूक व इतर कलमांवर भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला.
यामध्ये पतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यास फिर्यादीचे वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी विरोध केला. त्यांना अॅड. राहुल खरे यांनी सहकार्य केले. सरकारी वकील अॅड. विश्वास सातपुते यांनी बाजू मांडली.