पुणे – राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. तर मावळते विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती सहकार आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर साखर आयुक्त म्हणून अनिल कवडे यांची नियुक्ती केली आहे.
शासनाने डॉ. पुलकुंडवार यांची नुकतीच सचिव संवर्गात पदोन्नती दिली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. राज्याचे साखर आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, गोंदीया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. याचसह रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक-संचालक, भूमि अभिलेख विभागात अतिरिक्त जमाबंदी आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
समृद्धी महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेचे काम त्यांनी पाहिले आहे. तत्पूर्वी, त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, परभणीमध्ये उपविभागीय अधिकारी, एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक आदी पदांवर काम केले आहे. शांत, संयमी अधिकारी म्हणून डॉ. पुलकुंडवार यांची ओळख आहे.