पुणे- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यासाठी 25 विषयांशी संबंधित पोजिशन पेपर विकसित करण्यात येत आहेत. यावर तज्ज्ञांकडून 24 ते 30 मे या कालावधीत अभिप्रायही मागविण्यात आले आहेत.
सर्व राज्यांमधील प्रक्रियेमध्ये एकवाक्यता राहावी यादृष्टीने विविध विषयांवरील पोजिशन पेपरसाठीचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेले आराखडे राज्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्य स्तरावरुन पोजिशन पेपर विकसनाची स्वतंत्र प्रक्रिया सुरू आहे.
शिक्षणाचे तत्वज्ञान, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, आरोग्य आणि कल्याण, योग, क्रीडा आणि तंदुरुस्ती, विज्ञान शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि समग्र प्रगती पुस्तक, पर्यावरण शिक्षण, भाषा शिक्षण, भारतविषयक ज्ञान, गणित शिक्षण आणि गणकीय विचार प्रक्रिया, मूल्य शिक्षण, सामाजिक शास्त्र शिक्षण, लिंगसमभाव शिक्षण, कला शिक्षण,शिक्षणातील तंत्रज्ञान, सर्व समावेशक शिक्षण, शिक्षक शिक्षण, लिखित आणि अलिखित गुणवत्तापूर्ण साहित्य प्रकाशन: समस्या, अडचणी आणि त्यावरील मार्ग, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यातील सहसंबंध, शालेय शिक्षणाचे पर्यायी मार्ग, शालेय शिक्षणात समाजाची बदलती भूमिका, शैक्षणिक समुपदेशन आणि मार्गदर्शन आदी विषयांवर अभिप्राय नोंदवावे लागणार आहेत.