पुणे –सध्या पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू आहे. या काळात जोराचे किंवा वादळी वारे वाहतात. शिवाय, विजा कोसळण्याचे प्रमाणही अधिक असते. अशा वेळी शेतीचे नुकसान किंवा जीवितहानी होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान (आयआयटीएम) संस्थेने “दामिनी’ हे मोबाइल ऍप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍपमुळे वीज आणि वादळाचे अंदाज अर्धा तास किंवा तासभर आधीच मिळत आहेत.
असे डाऊनलोड करावे ऍप
गुगल प्ले स्टोअरला जाऊन दामिनी ऍप डाऊनलोड करावे. आपणास आपले संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, पत्ता, पिन कोड व व्यवसाय इत्यादी माहिती समाविष्ट करून नोंदणी करावी. तसेच आपल्या फोनमध्ये लोकेशन ऍक्सेसला परवानगी द्यावी.
फायदा काय?
या ऍप वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच शहरी भागातील विजेच्या कोसळण्यामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे. शिवाय, शेती कामांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक सेन्सरची क्षमता 200 कि.मी. परिघाची
दामिनी ऍपसाठी “आयआयटीएम’ने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी 76 सेन्सर बसवले आहेत. प्रत्येक सेन्सर साधारण 200 कि.मी. परिघातील घडामोडींचा वेध घेण्याच्या क्षमतेचा आहे. विजांसह कडकडाट होण्यापूर्वी अर्धा तास आधी सेन्सरमधून इशारा मिळतो. नेटवर्कतर्फे “आयआयटीएम’ येथील “सेंट्रल प्रोसेसिंग युनिट’शी सेन्सर जोडण्यात आले आहेत. त्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज मोबाइलद्वारे समजणार आहेत.
शेतकऱ्यांना मिळतेय अधिकची माहिती या ऍपद्वारे फक्त पूर्वअंदाजच नाही, तर वीज म्हणजे नेमके काय? वीज कोसळणे म्हणजे नेमके काय? याची शास्त्रीय माहिती आणि विजेपासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे? याचीही सविस्तर माहिती सचित्र देण्यात आली आहे. ऍपवर ठिकाण टाकल्यानंतर त्या भागातील वादळी वारे अथवा विजेच्या कडकडाटांची शक्यता असल्यास ती समजणार आहे.