पुणे – महापालिकेच्या मोटार विभागाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आधी कचरा वाहतुकीसाठी खासगी वाहने भाड्याने घेण्यात आली. यानंतर आता ताफ्यातील कचरा वाहतुकीच्या वाहनांसाठी तब्बल 893 चालक ठेकेदारी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी 39 लाख रुपयांच्या निविदेस आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
हे चालक वर्षभरासाठी नेमण्यात येणार आहेत. या वाहनांसाठी आधी पीएमपीचे अतिरिक्त चालक घेण्यात येणार होते. मात्र, त्यांनी कचरा वाहतुकीच्या कामास नकार दिल्याने हे चालक ठेकेदारी पद्धतीने घेण्याची वेळ ओढावली आहे. कचरा वाहतुकीच्या वाहनांसह एकूण 1,300 वाहने आहेत. त्यासाठी कायम सेवेत असलेले 421, उर्वरित चालक ठेकेदारी पद्धतीने घेते. याशिवाय कचरा वाहतुकीसाठी निविदाही काढल्या असून काही वाहने वयोमानानुसार, निरस्त झाल्यानंतर उर्वरित वाहनांसाठी पीएमपीचे चालक घेण्यात येणार होते. त्यासाठी अतिरिक्त चालकांची माहिती पीएमपीने दोन्ही महापालिकांना दिली होती.