पुणे- (गणेश आंग्रे) महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जवळ आल्याने पक्षांतराला वेग आला आहे. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर मित्रपक्षाला न दुखावण्याचे धोरण राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखले आहे. त्यामुळेच शिवसेना आणि कॉंग्रेसमधील अनेक इच्छुकांचे पक्षांतर लांबणीवर पडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवसेना आणि कॉंग्रेसमधील विद्यमान नगरसेवक अथवा जिल्हापरिषद, पंचायत समित्यांचे सदस्य यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी सबुरीचा सल्ला देत थांबण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील मित्र पक्षातीक काही इच्छुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांचे पक्षांतर घडवून पवार यांच्यावर छाप पाडण्यासाठी स्थानिक नेतृत्वही उत्सुक आहेत.
“प्रवेश तूर्तास थांबवा. योग्य वेळी त्यांचा प्रवेश करू,’ असा सल्ला देत पक्षप्रवेशासाठी अजून काही दिवस थांबण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत, पुण्याच्या राजकारणात दादांचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या मात्र नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादीच्या नेत्याने ही माहिती दिली. काही इच्छुकांनी अजित पवार यांच्याशी मध्यस्थांमार्फत संपर्क साधला. मात्र, त्यांनी “सध्या भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग करूयात. मित्र पक्षांचे इन्कमिंग निवडणुकांच्या आधी करू’ असा संदेश दिला आहे.
जोरदार इन्कमिंगची शक्यता
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत उमेदवारी मागण्यासाठी जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर प्रयत्न करण्याचे पवार यांनी सुचविले. मूळचे राष्ट्रवादीचे असणारे आणि नंतर भाजपला मिळालेले, आता मात्र राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यास अनेकजण इच्छुक असल्याचे बोलले जाते.
…म्हणून “आस्तेकदम’ भूमिका
मालेगाव जि. नाशिक येथे नगरसेवकांचे पक्षांतर घडवल्याने कॉंग्रेसची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यातून सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. अशी शक्यता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मित्रपक्षांसाठी “आस्तेकदम’ भूमिका स्वीकारल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.