पुणे –भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून पालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. या भ्रष्टाचाराची तसेच सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या वादग्रस्त निविदांसह यात सहभागी असलेल्यांची “सीबीआय’ चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.
स्थायी समिती बैठकीत बहुउद्देशीय कामगार पुरवण्याचे 41 कोटींच्या निविदेला मान्यता मिळाली आहे. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे सदस्य नंदा लोणकर आणि बंडू गायकवाड उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघामधून निवडून आल्यानंतर पलिकेत गैरव्यवहार वाढला आहे. पालिकेतील विविध पदे टेंडर काढून वाटली जातात, याची चौकशी करण्याची मागणी विविध शासकीय संस्थांकडे करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची तक्रार करणार
महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असून त्यांनी कायद्याप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. सनदी अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने काम करण्यात येत आहे. शहराच्या दृष्टीने आवश्यक असणारे प्रस्ताव आयत्यावेळी स्थायी समितीकडून समोर आणले जातात. नियमांची पालमल्ली करण्यात येत असल्यामुळे याची तक्रार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.