‘पुणे-नाशिक’करांसाठी “गुड न्यूज’

मंचर (पुणे) :- पुणे-नाशिक रेल्वेला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देत प्रकल्पातील 20 टक्‍के म्हणजेच 3 हजार 208 कोटी रुपये खर्चाचा वाटा उचलावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नजीकच्या काळात प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने विविध स्तरावर पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यानंतर 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली. याद्वारे राज्यातील पहिल्या तीन प्रकल्पांमध्ये तसेच ब्रिटिशकालीन रेल्वे बोर्डाच्या पिंकबूकमध्येही 16 हजार 39 कोटी रुपये किमतीच्या हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी. यासाठी फेब्रुवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली आणि या प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधीची बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले.

मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही प्रक्रीया पुढे सहा-सात महिने लांबणीवर पडली. त्यांनतर गेली तीन महिने पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा सुरू केल्याने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजीव कुमार, परिवहन विभागाचे सचिव आशिष कुमार सिंग, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत “ग्रीन सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. लवकरच या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळून माझ्यासह या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.