नवी दिल्ली – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे गेल्या दोन दिवसात भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या मूल्यात घट होत होती. मात्र शुक्रवारी या दोन्ही धातूच्या दरात भरपूर वाढ झाली.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 286 रुपयांनी वाढून 48,690 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले, तर तयार चांदीचे दर 558 रुपयांनी वाढून 65,157 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1852 डॉलर प्रती औंस तर चांदीचा दर 25.40 डॉलर प्रति औंस होता.
भारतात वाढलेल्या दराबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सकाळी रुपयाच्या मूल्यात घट झाल्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढले. रुपयाचा भाव कमी झाल्यास सोन्याची आयात महागात पडते. त्यामुळे त्या अवस्थेत सोन्याचे दर वाढतात असे त्यांनी सांगितले.
अजूनही सोने 50 हजार रुपयांच्या खाली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली योग्य ठरतात असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते. मात्र एकूण जागतिक परिस्थिती पाहता आगामी काळात सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.