पुणे, दि. 10 -शहरात यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असतानाही महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात तब्बल 175 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी पालिकेने सुमारे 1 कोटी 40 लाखांची निविदा काढली होती. या हौदांमध्ये सुमारे 54 हजार 703 गणेशमूर्ती विसर्जन झाले होते. दरम्यान, या कामासाठीचे पैसे देण्यासाठी निधी नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 1 कोटी 5 लाख रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, एकूण विसर्जन आणि झालेला खर्च पाहता एक मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेस सरासरी 250 रुपयांचा खर्च आला आहे.दरम्यान, यंदा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात फिरते हौद ठेवण्यात येऊ नयेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिकेकडे केली होती.
महापालिकेकडून 2020 आणि 2021 मध्ये शहरात करोना असल्याने गणेशोत्सवात शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना शहरात फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. मात्र, यावर्षी करोना संकट संपल्याने गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत असल्याने प्रशासनाने आधी केवळ 75 गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापालिका आयुक्तांनी नदीत विसर्जनास मनाई करण्याचे धोरण असल्याने वाहनांची संख्या दुप्पट करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रशासनाने सुमारे 1 कोटी 35 लाख रूपये खर्चाची निविदा काढली होती. मात्र ही निविदा जादा दराने आली होती. यावर्षी गणेशोत्सवात शहरात सुमारे 6 लाख 65 हजार 645 गणेशमूर्ती विसर्जन झाले असून, त्यात सुमारे 54 हजार 703 मुर्ती विसर्जन फिरत्या हौदात झाले आहे. मात्र, या कामाबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आल्याने प्रशासनाकडून या कामाची तपासणी केली असून, कमी पडणारा 1 कोटी 5 लाखांच्या निधीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला आहे.