पुणेच गेलंय खड्यात

पुणेकरांना मानदुखी, पाठदुखीचा त्रास : वाहनेही खिळखिळी

पुणे – पावसाळा आणि पुण्यात खड्डे हे एक समीकरणच बनले आहे. यंदा शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यात गेले आहेत. अनेक डांबरी रस्त्यांवरील खडी उखडली असून परिणामी त्या जागी भलेमोठे खड्डे पडल्याचे दिसते. तर काही सीमेंटच्या रस्त्यांच्या कडेला असणारा डांबरी पॅचही उखडला आहे. अजस्त्र खड्ड्यांमुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून अनेकांना मानदुखी, पाठदुखीचा त्रास सतावत आहे. तसेच वाहनेही खिळखिळी होत आहेत. 

पुणेकरांचा कररुपी पैसा पाण्यात गेला असून दरवर्षी हेच चित्र कमी-अधिक प्रमाणात दिसत असल्याचा आरोप पुणेकरांकडून होत आहे. पालिकेच्या वतीने शहरामध्ये नवीन रस्ते करणे, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पावसाळ्यानंतर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी सरासरी तब्बल 600 ते 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. केवळ रस्ते आणि पदपथांवर एवढा खर्च करूनही पुणेकरांच्या नशिबी रस्त्यांची प्रचंड दुर्दशाच येत आहे.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था झाली आहे. बहुतेक सर्वच रस्त्यांना ओढा-नाल्यांचे स्वरुप येत असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तर एक-दोन मोठ्या पावसातच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या, दुरुस्ती केलेल्या रस्त्यांना खड्डे पडतात.

खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली असून सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. शहरामध्ये दरवर्षी पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, केबल, सीएनजी, एमएनजीएल गॅस आदी कामांसाठी रस्ते खोदाई करण्यात येते. यामध्ये पालिकेच्या वतीने रस्ते खोदाईला परवानगी देताना खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. तर महापालिकेच्या काही विभागांमार्फत रस्ते खोदाई केल्यास रस्ते दुरुस्तीची जबाबदारीदेखील त्याच विभागाची असते. मात्र, यंदा शहरामध्ये रस्ते खोदाईनंतर करण्यात येणारी दुरुस्ती आणि डागडुजी व्यवस्थितरित्या न झाल्याने खड्ड्यांमध्ये अधिकच भर पडते.

अशास्त्रीय पद्धतीमुळे खड्डे
सिमेंट रस्ते करताना शास्त्रीय पद्धतीचा विचार केलेले दिसत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्याची कोणतीही सुविधा नसल्याने रस्ता आणि पदपथामधील भागामध्ये खड्डे पडून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. यावरून दुचाकी घसरून लहान-मोठे अपघातही गेल्या काही दिवसांत झाले आहेत. यामुळे एकूणच शहरातील रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उभा ठाकला आहे.

शहरात तीन-चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या मोठ्या पावसामुळे काही ठिकाणच्या रस्त्याची चाळण झाली आहे. सोमवारपासून (दि. 19) रस्त्यांची डागडुजी-दुरुस्ती करण्यास सुरुवात होईल.
-विजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग

अशास्त्रीय पद्धतीमुळे खड्डे
सिमेंट रस्ते करताना शास्त्रीय पद्धतीचा विचार केलेले दिसत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्याची कोणतीही सुविधा नसल्याने रस्ता आणि पदपथामधील भागामध्ये खड्डे पडून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. यावरून दुचाकी घसरून लहान-मोठे अपघातही गेल्या काही दिवसांत झाले आहेत. यामुळे एकूणच शहरातील रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उभा ठाकला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.