बिहारीच आहे

पाटणा – पाटण्यातील बांकीपूर विधानसभा मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून भाजपचे नवीन कुमार सिन्हा सातत्याने विजयी झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात त्यांचा मुलगा नितिन नवीन येथून विजयी झाले आहेत. थोडक्‍यात या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखण्यात भाजपला यश आले आहे. मात्र यंदा प्रथमच भाजपला येथून मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ज्येष्ठ अभिनेते व पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा यांना यंदा कॉंग्रेसने या मतदार संघातून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला कडक टक्कर द्यावी लागणार आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभेत पाटणा साहिब मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या मतदार संघावर त्यांची घट्ट पकड असल्याचे मानले जाते. आता त्यांच्या मुलालाच येथून कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे लढत रंगतदार होणार आहे.

चित्रपट क्षेत्रात अपयशी ठरल्यानंतर राजकारणात उतरण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. बिहारलाही ते मॉडेल नवे नाही. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवानही अगोदर बॉलिवूडमध्येच डेरेदाखल झाले होते. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आता लव सिन्हा यांचा प्रवासही त्याच दिशेने सुरू आहे.

लव सिन्हा यांनी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या पलटन या चित्रपटात काम केले होते. युध्दावर आधारित या चित्रपटाची निर्मिती जे. पी. दत्ता यांनी केली होती. 2010 मध्ये आलेल्या सदीयां या चित्रपटाद्वारे लव यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यात हेमा मालिन, रेखा, ऋषि कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र नंतर लव यांच्या कारकीर्दीला विशेष आकार आला नाही व आता त्यांनी नवी वाट पकडली आहे.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा मोठे नेते असले तरी ते केवळ निवडणुकीच्या काळातच उगवतात असा त्यांच्यावर आरोप व्हायचा. आता लव सिन्हाही केवळ मते मागण्यासाठीच येथे येतील अशी कुजबुज सुरू झाली आहे. त्यासंदर्भात बोलताना लव सिन्हा म्हणाले की, पाटण्यात आमचे घर आहे. 2009 पासून मी येथे येतोय. अगोदर वडिलांच्या कामासाठीही यायचो. आताही त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरलो आहे.

बांकीपूरबद्दल आणि येथील समस्यांबाबत काय माहिती आहे, असे विचारल्यावर रस्ते, वीज, नाले आदी अन्यत्र असतात तशा सगळ्याच समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आता येथे राहतोय तर सातत्याने वीज जात असल्याचे पाहतो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.