मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
टाकळी हाजी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन (दि.17) फेब्रुवारी रोजी शिक्षक नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील चंपक मैदानात होणार असल्याची माहिती संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते व जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे यांनी दिली. दरम्यान, यावेळी जुन्या पेन्शनचा प्रश्न गाजणार आहे.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात जुन्या पेन्शनचा प्रश्न प्राधान्याने मांडला जाणार आहे, असे संघाचे विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब लांडगे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उत्तम भंडारे यांनी सांगितले.
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी नियमिततेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे, वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुख व तत्सम पदे 100 टक्के शिक्षकांतून भरणे, मुख्याध्यापक पदोन्नती करणे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे आदी महत्त्वाच्या प्रश्नांचा ऊहापोह अधिवेशनात केला जाणार आहे. शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे तालुकाध्यक्ष संतोष थोपटे व महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना खोमणे लहू शितोळे, संतोष शेवाळे, दीपक सरोदे, विलास गावडे यांनी यावेळी केले.
अधिवेशनासाठी विशेष रजा
दि. 17 2023 रोजी होणाऱ्या शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी शासनाने दि. 15 ते 17 फेब्रुवारी अशी विशेष रजा मंजूर केली आहे. या शिक्षण परिषदेत नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.