पवनानगर – मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसात तब्बल एक कोटींपेक्षा अधिक गुलाब फुलांची विक्री झाली आहे. त्यातून 15 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होते. “व्हॅलेंटाईन डे’च्या काळात गुलाबाला केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठया प्रमाणात मागणी असते. साधारणपणे 25 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात गुलाबाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
मावळ तालुक्यात 250-300 हेक्टरवर गुलाब क्षेत्र आहे. यामध्ये 30 टक्के खाजगी कंपनी व 70 टक्के शेतकरी आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या 70 टक्के गुलाब फुलांचे उत्पादन मावळात होते. निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनही मिळते. “व्हॅलेंटाईन डे’साठी लाल रंगाच्या टॉप सिक्रेट या जातीच्या गुलाबाला जास्त मागणी असते. दरवर्षी मावळातून 70-80 लाख फुलांची निर्यात होत होती. यंदा मात्र एक कोटी फुलांची मावळातून विक्री झाली आहे.
यंदा 29 जानेवारी रोजी पहिली गुलाबाची शिफमेट परदेशात रवाना करण्यात आली. नऊ फेब्रुवारीपर्यत परदेशात माल पाठविण्यात आला. त्यानंतर गुलाबांची फुले स्थानिक भारतीय बाजारपेठेत पाठविण्यात आली.
देश-परदेशात विक्री
देशांतर्गत दिल्ली, सुरत, अहमदाबाद, बडोदा, गुवाहटी, राजकोट, जम्मू, हैदराबाद, पटना, पुणे, मुंबई येथे गुलाबाची विक्री झाली. तर परदेशातील हॉंलंड, जपान, आँस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका, मलेशिया येथे गुलाबाची निर्यात केली.
स्थानिक बाजारपेठेत मिळाला जादा दर
गुलाबाची निर्यातीसाठी प्रतिफूल सरासरी 22 रूपर्यतापर्यत दर ठरविण्यात आला होता. सध्या निर्यातीसाठी वाहतूक, जीएसटी धरून प्रति फूल 11-12 रूपये असा खर्च येत आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रतिफूल 10-15 रूपये दर
मिळत आहे.