राजगुरुनगर -राजगुरूनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी विकास आराखडा समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि. 14) काढला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात का होईना सरकारला जाग आली आहे नव्हे, जाग आणली आहे.
गेली अनेक वर्षांपासून राजगुरूनगरमधील नागरिक व हुतात्मा राजगुरू प्रेमी हुतात्मा राजगुरू स्मारकासाठी निधी मिळावा या मागणीसाठी प्रयत्नशील होते. वेळप्रसंगी अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले; मात्र झोपलेल्या शासनाला जाग आली नाही. राज्यकर्त्यांनी नुसत्या वल्गना आणि आश्वासने दिली होती; मात्र यासाठी प्रत्यक्ष अपेक्षित तेवढे प्रयत्न झाले नव्हते. शासकीय पातळीवर केवळ आराखड्यांमागून आराखडे बनविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र निधी मिळाला नाही.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ वाडा भग्नावस्थेत झाला. त्यासाठी आंदोलने झाले पुरातत्व विभागाने त्यासाठी निधी उभा केला; मात्र प्रत्यक्ष काम करताना या कामात भ्रष्टाचार झाला. त्यासाठी रास्ता रोको जाळपोळ झाली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पुढे हे प्रकरण शांत झाले; मात्र स्मारक व परिसर विकासाला चालना मिळाली नाही.
पुरेसा निधी न मिळाल्याने देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक दुर्लक्षितच राहिले होते. वर्षनुवर्षे मागणी करूनही पुरेसा निधी मिळत नसल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी लक्षवेधी मांडली आणि अवघ्या सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यसरकारने तातडीने यासाठी समिती स्थापन केली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने तसा शासन निर्णयही काढला आहे.
अशी असणार समिती
नव्याने स्थपन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त असणार आहेत. सदस्य म्हणून खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार भिमराव तापकीर, अतुल भातखळकर, दिलीप मोहिते-पाटील, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ माजी सदस्य नितीन गुलाबराव गोरे, रमेश कोंडे, उल्हास तुपे,राजेश पांडे धीरज घाटे, डॉ. राम आपटे, जिल्हाधिकारी, पुणे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक, सदस्य सचिव पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय.
31 मे पर्यंत अहवाल द्यावा लागेल
या समितीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचा संपूर्ण अभ्यास करुन दि. 31 मे, 2023 पर्यंत अहवाल सादर करावा. वित्त विभागाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार असलेला प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अशासकीय सदस्यांना लागू असेल; मात्र त्यांना विमान प्रवास आणि रेल्वेच्या वातानुकूलीत प्रथम वर्गाचा प्रवास अनुमती योग्य असणार नाही.