राजेंद्र (बापू) काळभोर
लोणी काळभोर -सध्याची तरुण पिढी शारिरीक तंदुरुस्तीच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. खाण्यावर नियंत्रण, दररोज जिममध्ये घाम गाळायचा. त्या बरोबरच स्टॅमिना वाढण्यासाठी आठवड्यातून एक दिवस उंच डोंगरावर जाऊन गिर्यारोहण करायचे. या संकल्पना तरुण पिढी अवलंबित आहे. त्यामुळेच लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील उंच डोंगरावर गिर्यारोहण करण्यासाठी दर रविवारी युवक, युवती, महिला यांची गर्दी होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून पुर्वेकडे 18 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर गाव आहे. महामार्गापासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा आहे. प्रभु रामचंद्र व सीता वनवासात असताना काही दिवस येथे राहिले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्राचा विकास कै. देविपुरी उर्फ धुंदीबाबा यांनी 1960 ते 2004 दरम्यान केला आहे.
येथे सन 1984 व 1996 मध्ये चारही पीठाच्या शंकराचार्यांच्या उपस्थितीत धुंदीबाबांनी गायत्री महायज्ञ आयोजित केला होता. सध्या येथे पीएमपीएमएलची हडपसर (गाडीतळ) ते तीर्थक्षेत्र रामदरा अशी बससेवा ही सुरू करण्यात आली आहे. निसर्गरम्य तीर्थक्षेत्र रामदरा व शेजारीच हिरवागार डोंगर यामुळे येथे येणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात असलेले तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय गिर्यारोहकांना आकर्षित करीत आहे.
गिर्यारोहक संस्था स्थापन करावी
या परिसरात अधूनमधून बिबट्या आल्याच्या बातम्या येतात. त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी योग्य त्या तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहण करणे आवश्यक आहे. जुन्या व अनुभवी गिर्यारोहकांनी तीर्थक्षेत्र रामदरा परिसरात एखादी गिर्यारोहक संस्था स्थापन करुन येथील गिर्यारोहणाला प्राधान्य देण्याची गरज आहे.