कराड/रेठरे बुद्रुक -तीस-चाळीस वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची गरज म्हणून जुनी पेन्शन आवश्यकच आहे. तेव्हा “एकच मिशन… जुनी पेन्शन’ या मागणीसाठी सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या राज्यव्यापी संपास राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे राज्य प्रतिनिधी अजितराव पाटील-चिखलीकर यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपास शुक्रवारी 17 रोजी त्यांनी भेट दिली. तसेच त्यांच्या संपास कॉंग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री पाटील-चिखलीकर म्हणाले, सरकारी कर्मचारी प्रामाणिक काम करतात म्हणून समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालतात. परंतु, सरकारी कामे पूर्ण करून देणारा कर्मचारीच जर समाधानी नसेल; तर तो सेवा कशी पूर्ण देईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना जुनी पेन्शन मिळायलाच हवी. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा प्रथम अधिकारच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, संपाच्या चौथया दिवशीही कराड तालुक्यातून संपकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजलेपासून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी कराड तहसीलदार कार्यालय परिसरात घातलेल्या मंडपात ठिय्या मांडला होता.