सासवड -शिक्षण हे केवळ गुण मिळविण्यासाठी घेऊ नका तर स्वतः मधील नैपुण्य विकसित करा. स्वतःमधील सॉफ्टस्किल्स विकसित करा. स्वतःशी स्पर्धा करा. स्वतः च्या चुका शोधा त्या चुका सुधारत पुढे जा. संघर्ष आहे, पण स्वतःची आवड जपत जगले तर आयुष्य सुंदर असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सासवड (ता पुरंदर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने विचारलेल्या तुमच्या विद्यार्थी ते संसदरत्न या प्रवासाबद्दल सांगा,
या प्रश्नला उत्तर देताना खासदार सुळे बोलत होत्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, जेष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, कृषी विकास संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे,
पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहुरकर, आशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, पुष्कराज जाधव, योगेश फडतरे, सासवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, मयूर जगताप, निता सुभागडे, वंदना जगताप, ऍड. कला फडतरे, कुमुदिनी पांढरे, भारती शेवाळे, अतुल जगताप, संदेश पवार, तेजस कराडे, उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, फार्मसी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य स्मिता पवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, समाजात मूलभूत बदल घडत असून ते घडायलाच पाहिजेत. माणसाच्या मेंदूत आणि विचारात बदल घडायला हवेत. राज्यघटनेवर श्रद्धा असून राज्यघटनेत लिहिल्याप्रमाणे जगले पाहिजे. समाजात वावरत असताना जात, धर्म या बाबींना अजिबात महत्त्व देत कामा नये, असे त्यांनी नमूद केले.