पुणे – राज्यातील इयत्ता दहावीच्या तब्बल 2 लाख 2 हजार 917 विद्यार्थ्यांना कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल वाढीव गुणांचा लाभ मिळाला आहे. त्यात चित्रकला आणि लोककलेसाठीचे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
विविध कला आणि क्रीडा नैपुण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत 3 ते 25 दरम्यान अतिरिक्त गुण दिले जातात. गेल्या वर्षभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे अपवादानेच कला-क्रीडा स्पर्धा झालेल्या असताना या विद्यार्थ्यांना मागणी केल्यामुळे हे वाढीव गुण देण्यात आले आहेत.
यंदा राज्यातील सर्वाधिक 1 लाख 65 हजार 73 विद्यार्थ्यांना चित्रकलेकरीता गुण प्राप्त झाले आहेत. सर्वांत कमी एनसीसीच्या केवळ एका विद्यार्थ्यालाच वाढीव गुण मिळाले आहेत. क्रीडासाठी 15 हजार 793 विद्यार्थ्यांना, लोककलेसाठी 15 हजार 765 विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
शास्त्रीय गायनासाठी 2 हजार 212, शास्त्रीय नृत्यासाठी 1 हजार 875, वाद्य वादनासाठी 1 हजार 354, स्कॉऊट गाइडसाठी 801 याप्रमाणे गुण मिळाले आहेत. पुणे विभागातील सर्वाधिक तर लातूर मधील कमी विद्यार्थ्यांना वाढीव गुणांचा लाभ मिळाला आहे.
7 हजार 502 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण…
राज्यातील 7 हजार 669 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 7 हजार 502 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 97.84 टक्के एवढा लागला आहे. दिव्यांगामधील विविध वर्गातील विद्यार्थ्यांचा निकालही उत्तम लागलेला आहे.