काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : आमदार कांबळे
पुणे – घोरपडी गाव येथील पुणे-सोलापूर मिरज लाइनवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झालेले असून, डिसेंबर 2023 अखेर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी दिली.
कांबळे यांनी पुलासाठी आमदार निधीसह, राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कांबळे यांनी नुकतीच महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन पाहणी केली.
घोरपडी येथील या रेल्वे ट्रॅकवरून दिवसभरात जवळपास 104 ट्रेन ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी असलेले रेल्वे फाटक हे साधारण 104 वेळेस बंद होते. परिणामी, शहरातील तसेच कॅम्प भागातील नागरिकांना मुंढवा-केशवनगर- खराडी या भागात जाण्यासाठी प्रचंड त्रास होतो. तसेच मुंढवा, घोरपडी आणि कल्याणीनगरमधील नागरिकांना शहरात येताना कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारले जात आहेत.
सोलापूर मार्गावरील पुलाचे काम वेगाने सुरू आहे. तर, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील वरील उड्डाणपुलाच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवाळीपर्यंत या कामाची देखील निविदा मागवण्यात येऊन पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आमदार कांबळे यांनी सांगितले.